*बाई(साहेब)*
'इंगलंडची राणी गेली ना ताई' - पहिली. क्वीन एलिझाबेद मेली हे मला तिच्याकडून कळलं. शेतकऱ्याची हालत किती वाईट आहे हेमला दुसरी कडून कळलं जेंव्हा ती तिला म्हणाली 'बाई, माझ्या काकांनी बारा ट्रॅक्टर कांदा भरला होता तीन महिन्यांपूर्वी चाळीत. कालविकायला म्हणून बाहेर काढला तर पाच ट्रॅक्टर भरला. खूप नुकसान झालं'. 'कोपऱ्यावरच्या प्लम्बरचा खून झाला की त्याने आत्महत्याकेली हे अजूनही समजलं नाही ताई' असं तिसरी सांगत होती - जणू काही गौप्यस्फोट करत आहोत अशा थाटात. चवथी काकांनाओरडून सांगत होती - 'काका नाश्ता उरकून घ्या म्हणजे मी जायला मोकळी'. 'पाचवी काय म्हणाली? असं तुमच्या पैकी कोणीतरीविचारलं. पण आपण चवथी वरच थांबू. परत प्रश्न - ह्या कोण आहेत? सांगतो ना.
गल्ली ते दिल्ली ते आंतरराष्ट्रीय बातम्या मला पहिली ते चवथी या देत असतात. पहिली साधारण सव्वा नऊ वाजता येते - मी लॅपटॉपसुरु करत असतो तेंव्हा. नवरा तिला गाडीवर सोडतो आणि काहीतरी मराठीत मनोरंजक बोलून ते निरोप घेतात. पहिलीचा पहिला प्रश्नअसतो - आज क्या सब्जी करनेका है? आणि इथपासून साडेतीन पर्यंत मला मराठी स्टाइलमध्ये हिंदी ऐकावं लागतं. पहिलीचीमालकीण नॉर्थ इंडियन आहे त्यामुळं हिंदी अस्खलित तर पहिलीचं हिंदी 'धेडगुजरी'.
*माझ्या बंगल्याच्या एका बाजूला चार रो हाउसेस आहेत. खिडकीजवळ माझा टेबल आहे. सव्वा नऊ ते चार पर्यंत एकाबाजूला मी शेअरमार्केटमध्ये सौदे करत असतो तेंव्हा बाहेरून चार मोलकरणी आणि त्यांच्या मालकीणबाई यांचे संवाद कानावर येत असतात - अत्यंतजिव्हाळ्याचे, उद्बोधक. मोलकरीण आणि मालकीण या संबधावरचे सूक्ष्म अवलोकन मला करता येते. कोण कोणास धाकात ठेवत आहेहे समजते. शेजाऱ्यांकडे आज भाजी कोणती आहे हे समजते तर शेजारी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे हेही समजते. त्यांच्यागप्पांमध्ये विविधता तर असतेच पण प्रत्येकीची जगातील सर्व विषयांवर 'ठाम' मतं सुद्धा असतात. माझी अखंड ज्ञानसाधना अशी चालूअसते - सव्वानऊ ते चार पर्यंत.*
पहिलीने कुकर लावला की दुसरी येते. दुसरीची मालकीण महिन्याभरापूर्वी बाळंतीण झाली आहे. बाळाची ओव्याशेपाची धुरीमाझ्यापर्यंत पोहचते हल्ली. बाळंतिणीचं धुणं जास्त झाल्याने दुसरी नाराज असते. सारखी धुसपूस ऐकू येते. 'माझे सध्या उपवास चालूआहे, जास्त धुणं काढू नका' अशी सरळ आणि सोपी धमकी पहिलीने बाळंतीण मालकिणीला दिलेली मी ऐकली - नवरात्र काळात. दोन नंबरच्या घरात सारखे खटके उडत असतात. दुसरी कामावर आली की पहिलीच्या आणि तिच्या खालच्या आवाजात गप्पा होतात. दोन मुंग्या जशा एकमेकींना भेटतात तेंव्हा काय बोलतात असा जगाला पडलेला प्रश्न आहे अगदी तसाच प्रश्न मला पडलेला असतो. कधीकधी वाटतं, कभी कभी मेरे दिल मैं खयाल आता है कि तोड दू ये दिवारे और पुछू उनको ....
तिसरीचा चेहरा मी अजून पाहिला नाही. पण तिसरी आली हे मी आवाजावरून ओळखतो. तिसरीची मालकीण अध्यात्मात अखंडबुडालेली असते. अव्याहत जप ऐकायला येतो, तो ऑटोमॅटिक स्पीकर लावलाय. मालकीण आणि तिचा नवरा क्वचित बोलत असावेतम्हणून ते 'सुस्वभावी' असावे असा तर्क आहे. तिसरीने धुणं भांडी सुरु केल्याबरोबर तिच्या तोंडाची 'टकळी' सुरु होते. मालकीण थोड्यावेळेकरता अध्यात्मिक जग सोडून ऐहिक जगात येते. खूप प्रश्न तिसरीला विचारते. खत आणि पाणी मिळाल्यामुळे ती खुलते. आमच्याकॉलनीतील प्लम्बरचा 'खून की आत्महत्या' हे प्रकरण दहा दिवस रंगलं होतं. गावात हेल्मेट चेक करून पोलीस कसे पैसे उकळतात हेसांगते. एम ए सि बी रेट वाढवणार आहे हे तिला आधीच माहित असतं. मोदी चांगला आहे असं ठासून सांगते पण सिलेंडरचे भाववाढल्याने नाराज असते. मुख्यमंत्री एकनाथ बद्दल आदर. दोन तास 'टकळी' चालू असते पण पहिलीशी आणि दुसरीशी ती बोलत नाही - म्हणते 'कशाला कोणाच्या चांभार चौकशा करा. आपलं काम भलं आणि आपण भलं. नाही काहो ताई?'. मालकीण 'दोन घटका' आनंदात गेल्या मुळे काहीच बोलत नाही.
चवथी मात्र 'डॉन' आहे. चवथं कुटुंब 'बाईसाहेबांच्या ताब्यात'. 'काका नास्ता करून घ्या लवकर म्हणजे मी मोकळी' अशी ऑर्डर वजाविनंती. 'ताई मला न विचारता चादरी कशाला टाकल्या?' अशी तक्रार करते चवथी. 'पुढच्या वेळी २१८९ घेण्याच्या ऐवजी २३२२ घ्या. पोळी चांगली होते.' असं प्रेमाने सांगते. 'काकू या दिवाळीला काय देणार. आधीच सांगा ' डायरेक्ट डिमांड. 'बरं मी दिवाळी नंतर सहादिवस नाही त्यामुळे …… तुम्हीं का नाही बाहेर जात याच आठवड्यात'. काका आणि काकू नाचत असतात 'बाई साहेबांच्या' तालावर. भांडी “चोळताना” तिच्या तोंडाचा पट्टा सुरु होतो. तोंडाचा पट्टा ही उपमा तिच्यासाठी चपखल आहे. सराईत दांडपट्टेवाल्याच्या आवेशातती तोंडाचा पट्टा चालवीत असते. मोलकरणीच्या सतत सुट्या आणि त्या निमित्तानं घरच्या मालकीणीची होणारी चिडचिड असा प्रकारयेथे नेहमी.
*असं आहे माझं विश्व, खिडकी बाहेरचं. शेअर मार्केट मध्ये उलथापालथी होत नसेल तर मी बऱ्याच गप्पा ऐकत बसतो. हंडाभरमनोरंजन. चार प्रकारच्या चार 'बाया' आणि त्यांच्या 'मालकिणी'. एकमेकांशिवाय 'जगणं' नाही.*
आमचीचा नंबर पाचवा. ही 'पाचवी' भन्नाट आणि भिन्न आहे. आम्हीं मेड फॉर अदर आहोत. आमच्याकडे चार पाच वर्षांपासून आहे. काम अस्वच्छ करते म्हणून उल्काचा आणि तिचा 'ठराविक' संवाद वर्षानुवर्षे चालत आहे. दर तीन महिन्यांनी तिला पगारवाढ हवी असते- कारण महिन्यापूर्वीची पगारवाढ ती पंधरा दिवसात विसरते. असो.
Post a Comment