*मला म(द)त पाहिजे!*
*प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, व्हिक्टर फ्रॅन्कल म्हणतात ~ समोरची घटना आणि त्यावर आपली प्रतिक्रिया या मध्ये एक स्पेस असते. ज्यात असतो आपला चॉइस*
आजी निघून गेल्या आणि मी अपराध्यासारखं बघत उभा राहिलो ... आज.
*पंधरा दिवसांपूर्वी*
एका आटपाट नगराच्या उपनगरात मी राहत आहे. माझ्या घराच्या आजूबाजूला सुसंस्कारीत आणि सुबुद्ध लोक राहतात असा माझासमज. मी आणि उल्का कट्ट्यावर सकाळी सकाळी चहा पीत बसलो होतो. तेव्हढ्यात एक आजी समोरून चालत जात होत्या. किंचितलंगडत होत्या. उल्काने त्यांना सहज हटकलं - काहो लंगडताय? तर त्यावर काहीही न बोलता त्या कट्ट्यावर आल्या. आम्हीं त्यांना खुर्चीदिली. परत तोच प्रश्न - काहो लंगडताय? आणि इतर काही अनुषंगाने आणखी काही प्रश्न.
आजी खुर्चीत बसल्या की कोसळल्या हे मला समजलंच नाही. कारण त्यांच्या डोळ्यातील पाणी बघताच क्षणी माझे डोळे पाणावलेआणि 'दृश्य धूसर झाले'. आजी बोलू लागल्या. 'काय सांगू ताई, गुढगे लई दुखत आहे. मागच्या महिन्यापर्यंत मी माझं धुणं करायचे. पण आता होत नाही. शहात्तर वर्ष झाली. या पोराकरिता, सुनाकरीता काय नाही केलं? पण आता अजिबात लक्ष देत नाही माझ्यादुखण्याकडे. डॉक्टरकडे नेत नाही. त्यांना भीती वाटते - डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं तर? मुलगा तर म्हणतो - अशीच मरून जाशील तू , करोनात नाही का लोक गेले'. आजींचा आवाज जड झाला. 'मुलगा काय करतो?' - मी विचारलं. आज्जी म्हणाल्या 'शिक्षक लोकांनातो शिकवतो'. उल्काने चहा दिला. मी आजीला म्हणालो 'बघतो, गुरुजी रुग्णालयात काही करता येतं का !' नंतर आजी निघून गेल्या..... दुःख मागे सोडून.
नंतर उल्काने मला अधिक माहिती पुरवली. या आजी आमच्या मागच्या रो हाऊस मध्ये राहत होत्या. दोन महिन्यांपूर्वी थोड्या दूरच्या रोहाऊस मध्ये गेल्या - मुलानं रो हाउस घेतलं म्हणे.
माझ्या मनात आजींना कशी मदत करता येईल यावर विचार करू लागलो. गुरुजी हॉस्पिटल मधील एक उच्चपदस्त मित्राला फोन केला. काही करता येईल का हे विचारलं. मित्र म्हणाला 'फ्री ट्रेंटमेन्ट तर होणार नाही पण बघू काही करता येईल का!'.
*दहा दिवसांपूर्वी*
आजी सकाळी घरी आल्या, मी कट्ट्यावर बसलेला पाहून. विचारत्या झाल्या 'भाऊ विचारलं का रे हॉस्पिटल मध्ये. गुढघे खूप दुखतआहे.' मी सांगितलं 'डॉक्टर भेटले नाही अजून. भेटले कि सांगीन तुम्हांला'. खोटं बोललो मी. उल्काही दिग्मूढ झाली होती माझ्या उत्तराने.
मला व्हिक्टर फ्रॅन्कल आठवला. आजींना मदत करण्याच्या 'प्रतिक्रियेत' मी माझी 'सीमा' तर ओलांडत नाही ना? असा प्रश्न त्रास देऊलागला. आजींना मदत करतांना मुलाला समजणार. मग तो म्हणाला 'आमच्या कौटुंबिक बाबीत तुम्हीं लक्ष घालू नका', की सर्व संपलं. मुलगा आजीला आणखी छळेल. मला चॉईस करता येईना. म्हणून मी खोटं बोललो. दोन तीन मित्रांशी बोललो. उल्काशी बोललो.
विचारांती असंही लक्षात आलं की आपल्याला फक्त 'आठ आणे' बाजू माहित आहे - आजी जे सांगत आहे त्यावरून. पण मुलाचीबाजू? माहित नाही. कधीही माहित होणार नाही. म्हातारी माणसंही विचित्र वागतात - हा माझा स्वानुभव आहे. मी ही 'अतर्क्य' वागतोकी कधी कधी. 'दुसरी बाजू' - उरलेले आठ आणे - माहित नसतील तर ....
चर्चेअंती असं ठरलं की 'मदत करायचा विचार सोडून द्यायचा'. मनातून वाईट वाटत होतं पण काहीही करता येत नव्हतं.
*आज सकाळी*
दहा दिवसानंतर आजी घरावरून चालल्या होत्या. मला बघितलं. मला त्यांची नजर चुकवता नाही आली. मी 'अपराध्यासारखा' त्यांच्यासमोर उभा राहिलो. तेव्हढ्यात उल्का बाहेर आली. आज्जी बोलू लागल्या -'काल गेलत्ये गुरुजी मध्ये. तपासलं डॉक्टरांनी. ऑपरेशनकरावं लागेल म्हणे'. हे ऐकताच माझ्या मनावरील ताण, भार कमी झाला. उत्साहाच्या भरात मी विचारलं 'मग कधी करणार ऑपरेशन? खर्च किती?'.
आजी म्हणाल्या - 'खर्च ऐन्शी हजार! मुलानं सांगितलं - येव्हढे पैसे नाही माझ्याकडे. ऑपरेशन नाही करायचं. घरातच बसून रहा .... आणि जाशील ......' आजी घराकडे चालू लागल्या. मी आणि उल्का त्यांच्याकडे पाठमोरं सुद्धा पाहू शकत नव्हतो.
कट्ट्यावर परत आलो. रिकाम्या खुर्चीकडे बघितलं. आजी कधीच बसणार नाही या खुर्चीत.
माझं काही चुकलं काहो? आपल्या बाजूला सुबुद्ध लोक राहतात या 'समजेला' तडा गेला. किंबहुना मनात भूकंप झाला. 'असं कसं होऊशकतं?' - हाच विचार मन पोखरत आहे.
*व्हिक्टर फ्रॅन्कल ने सांगितलेली 'स्पेस' वांझ राहिली. समाजसेवा अवघड असते. कधी कधी ती न करण्यात शहाणपण असतं.*
Post a Comment