*फार पूर्वी नाही ...*
साधारण १९६५ साल. गंपती म्हणजे काय हे कळायला सुरवात झाली असेल तेव्हां. फार पूर्वी म्हणजे जेंव्हा नासिक एक गाव होतं, म्हणजे ते शहर नव्हते, तेंव्हा. गंपती जवळ आला की माझे वडील ट्रान्झिस्टर्स असलेला मोठ्ठा रेडिओ जेथे आम्हीं ठेवायचो ती रॅकरिकामी करायचे आणि स्वच्छ करीत. म्हणजे वर्षभराची धूळ हटवली जात. मागच्या वर्षाच्या सजावटीच्या खुणा नीट 'पुसायचे' हाअट्टाहास. मग आदल्या दिवशी आण्णा 'खळ' तयार करायचे. डिंकाची बाटली तेंव्हा त्यांना महाग वाटायची. आम्हीं सजावटीसाठी'घोटीव कागद' वापरायचो कारण तो चकाकणारा बेगडी कागद महाग होता. घोटीव कागदाच्या पट्ट्या उरल्या कि मी सांभाळून ठेवतअसे. दुसऱ्या दिवशी 'भिरभिरं' तयार करायला आणि गंपती च्या मागे लावायाला. रॅक सजली की मन प्रसन्न व्हायचं. नंतर अण्णांनी एकबल्बची माळ आणली होती. बरेच वर्षे ती टिकली. जसं जसं मी 'मोठा' होत गेलो तशी तशी मी सजावटीची जबादारी घेऊ लागलो. माझ्या कलेच्या आविष्काराची सुरवात गंपती समोर झाली. फार पूर्वी नाही ...
गंपती बसायच्या दिवशी मी आणि आण्णा 'गावात' जायचो - सायकलवर - पुढच्या दांडीवर बसून. बऱ्याच वेळा भाद्रपदात पाऊसअसायचा. नाशकात तेंव्हा सरकारवाड्याजवळच्या गल्लीतच गंपती मिळायचे. साधारण वीतभर उंचीचा - सहा इंचापर्यंत - आमच्याघरात वर्षभर असायचा. डेकोरेशन मध्ये दोन गंपती. एक जुना अन एक नवा. जुन्या गंपतीचे विसर्जन व्हायचे. नवे गंपती एका विशिष्ठजागी ठेवले जायचे - येता जाता ते दिसायचे. मग आपसूक 'नमस्कार' व्हायचा. मला बाप्पा देवघराऐवजी मोकळ्यावर ठेवलेलेआवडतात - कारण त्यांची दृष्टी आपल्यावर कायम असावी - देवाला नमस्कार नाही केला तरी. एकदा गंपती 'बसले' की घरात पाहुणाआल्यासारखं वाटायचं. आरती आणि प्रसाद - अलौकिक आनंद. पण मला ती 'सर्व भाज्यांची भाजी' अजिबात आवडत नसे. केवड्याचेफुल मात्र आवडायचे. आमच्या कॉलनीत प्रोफेसर पंडित कार्यक्रम आयोजित करायचे. सर्वात प्रथम सुधीर फडके यांचं गीतरामायण मीगंपती उत्सवात ऐकलं. शामची आई हा सिनेमा मी उत्सवात बघितला. मंगेश पाडगावकर मी उत्सवात ऐकले आहे. बौद्धिकही व्हायची - पण विषय आता आठवत नाही. दहा दिवस वातावरण सात्विक असे. पूर्वी 'देखावे' देखणे असायचे. सार्वजनिक गंपती 'वर्गणीतून' साकार होत. फार पूर्वी नाही ....
विसर्जनाच्या दिवशी वेगळी गडबड. वेगळी हुरहूर. तीन वाजता आम्हीं आमच्या विहिरीत जुन्या बाप्पांचं विसर्जन करायचो. मूर्ती खालीगेली की वर येणारे बुडबुडे मला अजूनही आठवतात. त्या विहिरीत कासव होते - आई सांगायची - तुझ्या जन्माच्या अगोदर पासून आहेते विहिरीत. मग मी आणि बहीण अण्णांबरोबर मिरवणूक बघायला. ठरलेला स्पॉट - मेहेर हॉटेल. लेझीम, दानपट्टा, ढोल असे खेळबघायला मज्जा यायची. गुलाल उडवला जायचा. मिरवणुकीत सात्त्विकता होती. भिभत्सपणा नव्हताच. दारू प्यालेला माणूस लगेचओळखू यायचा. वाकडी बारव वरून दुपारी तीन वाजता सुरु झालेली मिरवणूक पहाटे बारा ते तीन च्या दरम्यान संपलेली असायची. आम्हीं जेंव्हा मोठे झालो तेंव्हा मित्रांबरोबर उलट्या दिशेने मिरवणूक चालायचो. फार पूर्वी नाही ....
लोकमान्य टिळकांशिवाय कोणालाही गंपती उत्सवाचं महत्व कळलं नव्हतं. वॉर्डातील नगरसेवक कधीही सक्रिय नसायचे. उत्सवालाराजकीय धार नव्हती. समाज स्वतःहून सामील व्हायचा. फार पूर्वी नाही ....
*हल्ली मात्र प्रदूषण फार वाढलंय. प्रत्येक गंपती राजकीय झाला. भ्रष्ठाचारातून आलेला पैसे देऊन नगरसेवक 'गंपती' विकत घेतात. नकळत 'पक्षाचं' लेबल बरोबर येतं - मंडपात झेंडे दिसतात. बऱ्याच ठिकाणी - मंडपाच्या मागच्या बाजूला 'दारूकाम' चालतं. भ्रष्ट पैसेअसे भ्र्ष्ट कारणासाठी वापरले जातात. सात्विकता नावालाही नाही. 'सैराट', 'नवीन पोपट' अश्या गाण्यांमुळे ध्वनी प्रदूषण. पेंडॉल मुळेरस्त्यावर दहा दिवस गैरसोय होते. गंपती च्या उंचीची स्पर्धा सुरु झाली आहे. समाजाचं प्रबोधन होईल असे कार्यक्रम 'अपवादाने' दिसतात. राजकारण्यांनी समाजाचं 'भिरभिरं' केलंय. लोकमान्यांनी सुरु केलेला 'सामाजिक उत्सव' इतका प्रदूषित झालाय की - असंवाटतं - परत तो 'घरगुती' स्वरूपात असावा. माझ्या काळचा. १९६५-७० चा. हा बदल म्हणजे माझं दिवस असतानाचं स्वप्नरंजन आहे हेही मला कळतं.*
फार पूर्वी नाही .... अगदी आत्ता आत्तापर्यंत .... सगळं कसं छान होतं .... पण अचानक सर्व 'प्रदूषित' झालंय. तरीही 'बाप्पा मोरया' म्हणायचं अन पुढचा श्वास घ्यायचा.
Post a Comment