दिंडी : भेटीलागी जिवा ...
आज दक्षिण काशीला पोहचतांना माझी अवस्था तुकारामांनी रचलेल्या काव्यात जशी आहे तशी किंचित झालेली आहे. या निम्मितानेअजून एका काव्यातला 'भावार्थ' समजला. आपलं मन चंचल असतं, कशाचा तरी ध्यास घेत असते याची पुनश्च प्रचिती. पण एकदा'श्रीमुख' बघितलं की 'शांतपणा, नितळपणा' ची अनुभूती. अर्थात तीही तत्कालिक.
*भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहें ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी ।
वाट पाहे परि माउलीची ॥४॥
तुका ह्मणे मज लागलीसे भूक ।
धांवुनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥*
नासिकला आल्यावर मी प्रथम माझ्या सर्व माऊलींची 'गळाभेट' घेतली. मी सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद उल्काच्या चेहऱ्यावर आणिइतर सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर होताच.
*वाहिले ते पाणी, राहिले ते गंगाजल* - या उक्तीचा विचार करत असतांना मी स्वतःला विचारलं 'किती दिंडीजल राहिलं आहे आतातुझ्या बरोबर?'. आतूनच उत्तर आलं 'भरपूर'. अशी उत्तरे सहसा 'अतिउत्साहातूनच' येतात. पण माझं उत्तर ....
*हल्ली मी जे जे 'वाचायचं' राहून गेलंय ते वाचत आहे. ललित साहित्य जास्त वाचतोय. दोन वर्षें सातत्याने वाचन केल्यावर असं लक्षातआलं की - वाचून आनंद मिळाला पण तोही तत्कालिक होता. या वाचन प्रवासात 'मी जे सोप्पं आहे ते अधिक वाचलं'. संत साहित्य'दुर्लक्षित' झालं. विद्या व कला यांची देवता सरस्वती, तिचे उपासक ते सारस्वत व तिच्या कृपेने निर्माण झालेले वाङ्मय ह्या अर्थीहीसारस्वत हा शब्द वापरात होता. ज्ञानेश्वरांनीही ‘ हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले जी झाड’ यासारख्या अनेक ओव्यांमध्ये सारस्वत हाशब्द योजिला आहे. ललित साहित्य हा शब्द विद्यमान मराठी साहित्यव्यवहारात जास्त रूळला आहे. ‘सहित’ ह्या विशेषणापासूनसाहित्य हे भाववाचक नाम बनलेले आहे. एकत्र असणे, बरोबर असणे, असा त्याचा शब्दशः अर्थ. शब्द आणि अर्थ यांचे एकत्र अस्तित्व‘साहित्य’ या शब्दामध्ये मानले गेले आहे.*
दिंडी मूळे 'एक निश्चय' केला आहे. संत साहित्य वाचायचे. किंबहुना प्रयत्न करायचा - वाचायचा. तुकारामगाथा, दासबोध आणिनामदेव गाथा असा क्रम असेल. मी श्लोकांपेक्षा त्यांच्या 'निरूपणाला' जास्त महत्व देतो.
सगळ्यांची भेट झाल्यावर मला आता 'गाथेची' आस लागली आहे, जी चंद्रभागेत सुद्धा बुडाली नाही. विचारातील बदल हेच खरं'दिंडीजल, गंगाजल'.
तूर्तास लेखनसीमा. दिंडी २०२२ निमित्ताने झालेला प्रवास इथे समाप्त. आता फक्त आठवणी - आयुष्यभरासाठी.
Post a Comment