फुल-वाचन, अरण्य वाचनानंतर!
'चकवा-चांदणं' वाचल्यावर वन-ऋषी मारुती चितमपल्ली माझ्या मानगुटावर बसले की काय अशी शंका येऊ लागली आहे. ते कायमबसले तर माझ्या जीवनात आणखी आनंद येऊ शकतो. पुस्तक वाचल्यापासून माझा 'दृष्टी' आणि 'कोन' बदलला आहे असं वाटतं. कारण ....
माझ्या घराच्या रचनेत असंख्य खिडक्या आहेत. नवीन बागेचा 'भार' सांभाळतांना मी कुंड्यांची रचना अशी केली आहे जेणेकरूनकोणत्याही खिडकीतून बघितलं तर कुंड्या दिसायलाच पाहिजे म्हणजे येणाऱ्या - उमलणाऱ्या - प्रत्येक फुलाचा 'आस्वाद-आनंद' घेतायेईल.
सध्या एका रोपाचं फुल उमलतंय. त्या फुलाचा नाव-गाव, जात-पात, धर्म-पंथ मला माहित नाही. जाणून घेण्याची इच्छा नाही - कारणनावात काय आहे? असा प्रश्न बऱ्याचवेळा पडलेला असतो. ह्या फुलाचं विशेष म्हणजे, पूर्ण फुलण्यास सहा सात दिवस लागतात. एकदा फुललं की महिनाभर 'तसंच' राहतं आणि हळू हळू मरतं. सगळं कसं माणसासारखं आहे. लहान बाळाचे सहा सात वर्षे म्हणजेयाचे सहा सात दिवस. दररोज आनंदाला उधाण येणार. मी गेले सहा सात दिवस 'मुलाचे/बाळाचे/फुलाचे' खिडकीतून सकाळी दहावाजता फोटो घेतो. सकाळी दहा? कारण याच वेळी सूर्यदेव - त्यावर संपूर्ण 'प्रकाशवृष्टी' करत असतो. फुल तेजस्वी दिसतं यावेळी. किंचित पारदर्शक. मग पिवळा रंग अधिक खुलतो. तो बोलतो. लाल रंगावर प्रकाश पडला की .... सगळं नाही सांगत. फोटो बघा - आमच्या बाळाचे.
बाळाची चाहूल पहिल्या फोटोत. लाल रंगात पिवळा लपेटलेला आहे. कळी लांबसडक आणि उंच आहे. नाक धारदार आहे. यावरूनयेणाऱ्या मुलाचे गुण पाळण्यात दिसू लागतात. त्याचे हिरवे आई बाप काय तोऱ्यात उभे आहे ते पहा.
दुसऱ्या वर्षात अथवा दिवसात बाळाने फुलाने चांगले बाळसे धरले आहे. मोठं झालय. दात येत आहे की काय - पिवळं पिवळं काहीतरी.
तिसऱ्या दिवशी मात्र, बाळाचा आकार उकार समजू लागला. कळीतुन फुल होणं हा प्रवास निम्मा झाला होता. रोपाच्या प्रसव यातनाकधीच संपल्या होत्या. आता जेव्हढा जास्त सूर्य प्रकाश तेवढी 'वाढ' जास्त. आता 'अंगावरचं पिणं' कमी होत होतं.
चवथ्या दिवशी बाळात 'मी पण' आलं असं वाटलं कारण फुल आता चार वर्षांचं झालं होतं. बाळाला बोलता येत होतं तर फुलाला ..... बिपीन सांगत होता की फुलांच्या फुलण्यावर 'माळ्याच्या' स्वभावाचा परिणाम होतो. माळी ( म्हणजे मी ) सकारात्मक असेल तर, फुलांशी दररोज बोलत असेल तर, स्पर्श करत असेल तर ... फुलं छान फुलतात. मी हे करत असतोच. पण सकाळी सकाळी आमचं हेमूल, फुल ... सकाळी सात ते नऊ पर्यंत रेडिओ सुद्धा ऐकत असतं. उल्का उठली की पहिलं काम, रेडिओ लावणे. *फुलांना 'मन' असेलकाहो? चितमपल्ली 'हो' म्हणाले.* मला ऐकू आलं - मानगुटीवरून. तो पिवळ्यावरील किंचित 'काळा' ठिपका दिसतो का तुम्हांला? त्याला तुमची दृष्ट लागू नये म्हणून लावला मी. काजळ आहे ते. आता चार रंगाचं अविष्कार - लाल पिवळा काळा अन तपकिरी.
पाचवा दिवस म्हणजे आजचा - आमचं बाळ लै गुणी हाये बघा. पाच वर्षांचं, पाच दिवसांचं झालं. सर्वात जुन्या दोन पाकळ्या बघा. फुलात मध्ये पडलेला प्रकाश बघा. वरच्या भागातील पिवळ्या पाकळ्या बघा. किती कौतुक करू? ऑफ-बॅलन्स असूनही मलाआवडतंय. वाऱ्यावर डोलतांना सुंदर दिसतं. सगळं माणसांप्रमाणे.
उद्या आणखी एक फोटो. शेवटचा. त्या नंतर नाही कारण निसर्गाची 'सर्जनशीलता' थांबणार. मग 'ससटेनन्स' - एखादी गोष्ट सातत्यानेटिकून राहण्याची प्रक्रिया. हा प्रवास अपरिहार्य असला तरी मला नाही आवडत. म्हणून 'नो फोटो'. आणि तिसरी स्थिती - ह्रास ! त्याचेतर कोणीच फोटो काढत नाही.
असं आहे माझं 'फुल-वाचन'. मूल मोठं होतांना 'वाचता' यायला पाहिजे. हे फक्त आजी आजोबा झालं की करता येतं. फोटो काढायलावेळ असतो. निसर्गाकडे बघण्यासाठी 'डोळसपणा' येतो. मारुतीराया मुळे मी आता 'चिंतनपल्ली' होणार हे नक्की. ते बसले ना ... मानेवर.
Post a Comment