*वाचून 'वाईट' वाटले !*
६८७ पानं वाचून झाल्यावर, डोळे मिटले आणि स्वतःस प्रश्न विचारला की पक्षी मित्र मारुती चितमपल्ली यांचं 'एक वनोपनिषद' हेपुस्तक मला आवडले का? तर आतून उत्तर आले - हो आणि नाही. 'मारुतीरायाचे' हे आत्मचरित्र खूपच रटाळ वाटले. पुनरुक्ती खूपअसल्याने पाने वाढली. अतिसूक्ष्म नोंदींमुळे 'पसारा' खूप झाला, आत्मचिंतन राहून गेले. मी आत्मचरित्रात त्या व्यक्तीचे 'आयुष्यावरीलचिंतन' याचा शोध घेत असतो. अगदी याच कारणासाठी मला जयंत नारळीकर किंवा सचिन तेंडुलकर यांची आत्मचरित्रे नाही आवडली. ही तिघंही माणसं मोठी ... पण ......
याचा अर्थ असा का - की हे पुस्तक मी वाचले नसते तरी चालले असते. तर उत्तर 'नाही' असे आहे. *या पुस्तकाने माझ्या 'जाणिवा' समृद्ध केल्या. हे पुस्तक म्हणजे 'अरण्य वाचन' आहे. मी वर्षानुवर्षे जंगलं आणि वाळवंटे तुडवली आहे म्हणून हे पुस्तक मी वाचायलाचहवे होते. पण ते वयाच्या साठीत नव्हे तर पुस्तक प्रकाशित झाले २००५मध्ये, तेंव्हा. म्हणजे वयाच्या चाळीशीत.*
मी दुःखी मात्र झालो होतो हे नक्की. हे 'चकवाचांदणं' वाचतांना आयुष्याने मला आणखी एका ठिकाणी चकवलं होतं हे प्रकर्षानंजाणवलं. खूप वाईट वाटलं. साधन आणि संपत्ती ( आणि वेळ ) असूनही मी त्यांच्या जवळ जाऊ शकलो नाही, त्यांना बघितलं नाही, त्यांना ऐकलं नाही. असं का झालं? *डोळे असूनही 'डोळसपणा' नव्हता अंगात.* पॅशन म्हणजे पक्षांविषयी तीव्र उत्कट भावनेचा उद्रेकझालाच नाही कधी.
बारा वर्षे पूर्व आफ्रिकेत 'येड्यावाणी' फिरलो. युगांडा, केनिया, टांझानिया, झांझिबार, बुरुंडी, रुवंडा, कॉंगो येथील जंगलं तुडवली - अव्याहतपणे हो. पण फक्त प्राण्यांचा पाठलाग केला. पक्ष्यांकडे बघायचं राहून गेलं. पक्षी बघितले पण त्यात 'डोळसपणा' नव्हता. कारण ज्ञान कमी पडले. हजारो क्रेन्स बघितले कम्पाला येथे, सायबीरियावरून आलेले हजारो फ्लेमिंगो बघितले, नैवाशा केनिया येथे.... पण नुसते बघितले. 'जंगलात प्राणी बघणे' यात मी इतका झपाटलो होतो की ...... सांगतोच आता .....
त्या दिवशी सरंगेट्टीच्या वाइल्ड लाइफ लॉज मध्ये साडेचार वाजले होते. टांझानियातील सरंगेट्टी जंगलाला अजून माणसाने 'हात' लावलेला नव्हता. वर्जिन जंगल आहे आणि बिग फाइव्ह (सिंह , चित्ता, हत्ती, हिप्पो आणि आफ्रिकन म्हशी) सहज नजरेस पडतात. पणआज योग नव्हता कारण प्रचंड पाऊस पडत होता. इतका की जंगलातील रस्ते बुडून गेले होते. मी, उल्का, माझा ड्राइवर तिथल्यावनरक्षकाबरोबर गप्पा मारत होतो. मी एकदाही चित्ता बघितला नव्हता. गार्डला मी, गंमत म्हणून विचारलं 'मला चित्ता कधी बघायलामिळेल?'. तर तो म्हणे 'आत्ता'. त्याने सांगितलं - जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा चित्ता झाडावर बसलेला असतो. मी त्याला परत सहजविचारलं 'आपण जायचं का? माझ्याकडे नवीकोरी पजेरो आहे'. मंडळी - तिसऱ्या मिनिटाला आम्हीं त्या प्रचंड पावसात बाहेर पडलो. आमचं पाहून एका ब्रीटीशाने 'बायकोमुलांसह' त्याची क्रुझर काढली. आमचा 'चित्ता' शोध दोन तास चालला पण या महाशयांनीआम्हांला दर्शन दिले नाही. गुडघ्यावर पाण्यात रस्ता दिसेनासा झाला होता. अंधार पडल्यावर पाऊस चालूच असल्याने मी घाबरलोहोतो. मी समिटिला, ड्राइव्हरला, गाडी लॉजवर घे सांगितलं. आम्हीं नर्वस झालो होतो. ब्रिटिश मात्र पुढे गेला. संध्याकाळी आम्हींजेवतांना ब्रिटिशला भेटलो. तो म्हणाला - तुम्हीं पाठ फिरवल्यानंतर तिसऱ्या मिनिटाला आम्हांला चित्ता दिसला. मला खूप वाईट वाटले. रात्रीत मी फक्त स्वप्न बघत होतो. दुसऱ्या दिवशी घरी निघालो तेंव्हा सकाळी सहा वाजता आकाश निरभ्र होते. गाडी सुरु केली आणिसहज वर बघितलं - तर चित्ता महाशय झाडावर बसलेले होते आणि आमच्याकडे बघत होते. मनी वसे ते प्रत्यक्षात दिसे असं झालं. मोठाआनंद जाहला. असो.
तर हे पुस्तक वाचल्याने वाटू लागले की परत एकदा पूर्व आफ्रिकेत जावे - फक्त पक्षांना भेटायला, बघायला, ऐकायला. बकेट लिस्टमध्ये एक प्रवास ऍड झाला. वाईट वाटून झाल्यावर मला आनंदही वाटू लागला. कारण आता मी स्वप्नात आहे - मी पोहचलो आफ्रिकेत. लेक वीकटोरिया येथील पक्षी बघत आहे. रिफ्ट व्हॅली मधली जंगलं फिरतो आहे. पक्षी बघण्याची सर्वात सुंदर वेळ म्हणजे 'सूर्योदयआणि सूर्यास्त' याच्या आसपास. मोठी लेन्स आहेच .... आता परत एकदा सजीव जंगल बघायचं. जिथे सूर्य प्रकाश पोहचत नाही तेथेपुनश्च 'गमन'. नुसत्या विचारानं अंग ....
बघू. कितपत जमतंय. *पुस्तक आवडलं मला.*
Post a Comment