*जुनं ते सोनं- या उक्ती प्रमाणे आठ वर्षांपूर्वी लिहिलेली 'अनुदिनी' पाठवत आहे. नातवंडात गुंतल्यावरची घालमेल लिहिली आहे. बरं झालं बुवा - मी परत आलो*
सहवासातच प्रेम असतं !
सकाळपासून आपल्या घरात काहीतरी वेगळेपण आहे हे तिला बहुदा जाणवले असावे. किंचित ती सैरभैर झाली आहे असे वाटले ( हा कदाचित मला झालेला भास असावा किवां माझ्या मनात जे चालले आहे तसाच मी विचार करत असेन). जाणीवा ह्या मुक्या प्राण्याला सुद्धा असतात असं आपण बघतोच. खरं तर हिचा आणि माझा सहवास फक्त २० / ३५ दिवसांचा. पण गट्टी चांगली जमली होती. तीही तशी मुकीच होती, पण सारखी ओरडायची. मग तिला घ्यायला लागायचे. मग हाथवारे करून काय हवं आहे ते सांगणार आणि मग मी ते तिला देणार. कधीतरी मध्येच पायात येऊन घुटमळणार. हे तिचं घुटमळनं मला फार आवडायचं. १ वर्षाची झाली तरी दंगा करायला पटाईत झाली होती. कडेवर घेतलं कि चष्मा हे तिचं साध्य असायचं. मोठ्या चपळाईने माझ्या डोळ्यावरील चष्मा काढण्यात ती पारंगत झाली होती.
तिच्या सहवासात २५ दिवस कापुरासारखे भुर्रकन उडून गेले आणि आज माझा सौदीत परतण्याचा दिवस येऊन ठेपला. सहसा मला सौदीत येण्याचा ‘ खूप ‘ कंटाळा येत नाही. पण का कुणास ठाऊक, आज जरा जास्त जीवावर आले होते. या अमृततुल्य दिवसांना मी वंचित होणार आणि ६ महिन्यात हि आणखी मोठी होणार , हि जाणीव अस्वस्थ करीत होती. हि अस्वस्थता मात्र मी बिलकुल बाहेर सांडू दिली नाही.
साकेतने , माझ्या मुलाने, सर्व सामान बाहेरच्या दाराजवळ आणल्यानंतर, बाईसाहेब आईच्या कडेवरून खाली उतरल्या. सामान इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र मी जेंव्हा जिना उतरण्यास सुरवात केली तेव्हा रडायला लागली आणि माझ्या पायाजवळ आली. मी तिला उचलून घेतले. पण ऐकायला तयार नाही. परत खाली उतरली व माझ्या पुढ्यात येऊन बसली. मीहि , रडारड नको म्हणून , जिन्यात बसलो. शेवटी तिने दरवाजा बंद करायला घेतला. मीही शांतपणे बसून मजा बघत राहिलो. विचार करत होतो कि ‘ या चिमणीच्या ‘ मनात काय घालमेल चालली असेल.
माझ्या या विचारांच्या तंद्रीला टाक्सीच्या होर्नमुळे तडा गेला. ‘ बाबा उशीर होतोय ‘ साकेतने आवाज दिला. चिमणीला मी पटकन उचललं, घट्ट मिठीत घेतलं. हीच मीठी मला ६ महिने पुरवायची होती. दीर्घ मुका घेतला. पटकन तिला तिच्या आईकडे दिले व झपाट्याने जिना उतरलो. गाडीत बसलो , निरोप घेतला आणि निघालो. मी कुठेतरी वाचलंय ‘ निरोप संथपणे घेऊ नये, तो चटकन घ्यावा. आणि निरोप घेतला कि पाठीमागे बघू नये ’. मन जास्त विषण्ण होतं म्हणे.
पूर्ण प्रवासात मनाची घालमेल होत होती. सहवासातच प्रेम असतं याची नुकतीच प्रचीती आली होती. तिची आणि माझी पहिली भेट ती महिन्याची असतांना झाली. दुसरी भेट झाली तेव्हा ती ६ महिन्याची होती. पण आत्ता आम्ही भेटलो तेव्हा ती पूर्णपणे वर्ष्याची झाली होती. बोलता येत नसलं तरी सर्व कळत होतं. त्यामुळे गट्टी जमली. आत्ता मी जेंव्हा ६ महिन्यानंतर येणार तेव्हा परत पहिल्यापासून सुरवात. परत रापो ( rapport ) डेव्लोप ( develop ) करावा लागणार. पण ६ महिन्यातला ‘Present Tense‘ , मराठी त्याला ‘ चालू वर्तमान काळ ‘ म्हणतात , तो मी कायमचा गमावलेला असणार. सहवास नसेल तर प्रेम आटत जाते. साधा नियम आहे – एकत्रं राहत नसाल तर तुम्ही परके. अगदी बायको , भाऊ , मुलगा , सून , नातवं या नात्यात सुद्धा परकेपणा येऊ पाहतो. आपलं मन हि सत्य परीस्थिती मान्य करत नाही हा भाग वेगळा. पण एखादी गोष्ट मान्य केली नाही तर परिस्थिती थोडीच बदलते ? प्रत्येक expatriate बरोबर असंच होतं असावं. हेच मनातील कल्लोळ आणि ‘तेच हिंदोळे’. ह्याच समस्या ! skype, google talk ह्या सर्व मलम पट्ट्या आहेत. आपण वेळ मारून नेत असतो. समस्येवर कायम स्वरूपी उपचार करण्याची तयारी नसते. पोट भरलं तरी ताटावरून उठण्याची तयारी नसते ! असं का होतं ……….. ?
‘ साहेब गेट नंबर C का D ‘ , गाडीचालक विचारात होता. मी म्हटलं ‘ अरे कुठल्याही गेटवर सोड , देशाबाहेर जाण्याकरिता एकच इम्मिग्रेषण ( immigration ) असतं’. त्याने विचित्र नजरेने माझ्याकडे बघितलं आणि माझं समान trolly वर चढवलं.
आणखी एका परदेशी प्रवासाला सुरवात … सगळं मागे टाकून !
*सध्या नाशिकमध्ये - पंढरी अन आळंदी आपली*
Post a Comment