तुतू मैंमैं
अनुदिनीच्या (ब्लॉगच्या) शीर्षकावरून तुम्हांला नक्की वाटलं असेल की आज काहीतरी 'चमचमीत भांडणांविषयी' वाचायला मिळणार. पण मी तुमचा गॅरंटीड भ्रमनिरास करणार कारण मी आज माझ्या प्रेमाविषयी सांगणार आहे. ( इथेच क्लिप बघितली तरी चालेल )
नेहमीप्रमाणे रियाझ सुरु झाला. सायकलवर टांग मारली बरोबर पाऊणे सहा वाजता. अंधार होता. दव पडेल की काय असं वाटलं. आजरियाझात ओढ होती. 'त्याला' भेटायची. पाच दिवसांपूर्वी भेटला होता. दोन दिवस अवकाळी पावसाने बाहेर पडता आलं नाही तर दोनदिवस मखमलाबादच्या शेतात भटकलो. म्हणजे पाच दिवसांचा विरह. या पाच दिवसांत तो अजून लाल चा काळा झाला असेल. जेव्हढाकाळा तेव्हढा गोड, जास्त सुंदर. आणि 'तोही' माझी वाट पाहत असेल हे नक्की. हे वाचतांनाही तुमच्या मनात 'समलिंगी' वैगरे असे विचारआले असतील, युरोपियनांसारखे ! हरकत नाही.
बरोबर वर्षांपूर्वी त्याची अन माझी भेट झाली होती. त्या दिवशी दुगावचा चढ संपल्यावर मी विश्रांतीसाठी थांबलो होतो, एका झाडाखाली. सहज वर बघितलं तर, काळेभोर तुतू (Mulberry). हाताच्या अंतरावर. बाजूच्या झोपडीतील लोकांचा अंदाज घेतला. आणि झाडाच्याअगदी जवळ गेलो. त्याला हात लावला. हाच तो पहिला स्पर्श. कोणी काही म्हणत नाही, कोणीही बघत नाही हे पाहून मी त्याच्याशीसलगी केली. खूप तुतू खाल्ले. जे काळे होते तेच खाल्ले. लाल, कच्च्या तुतूंना हात लावला नाही. अशी आमच्या प्रेमाला सुरवात झाली. माझं स्वार्थी तर त्याचं निस्वार्थी. मग मी येतंच राहिलो, थांबतंच राहिलो, तुतू खातंच राहिलो. ऋतू बदलला. झाड निष्पर्ण झालं. पाऊसआला. तरीही बऱ्याचदा आमची भेट होत राहिली. दोन महिन्यांपूर्वी पालवी फुटली. महिन्यापुर्वीचे हिरवे तुतू लाल होऊ लागले. आणिआता काळे. काळेभोर. आमच्या प्रेमात एक नियम आहे. फक्त गोडंच बोलायचं, खायचं. त्याच्यावर कोणीही प्रेम करत नाही असं लक्षातआलंय. 'हा तुतू उद्या खाऊ' असं मी ठरवलं तर 'तो तुतू' तेथेच असतो.
हा माझा मित्र मला निसर्गाच्या परम सौंदर्याचे, औदार्याचे आणि अलिप्ततेचे भान माझ्या मनात कायम प्रज्वलित करीत असतो. एक पूर्णऋतुचक्र आम्हीं बरोबर आहोत. प्रेमात आहोत.
ना धों महानोर म्हणतात
*रानात सांडले निळे निळे आकाश
या पिकात केशर गंध तसा सहवास
घरकुल हेच पंखात पांघरू राती ग ...
बाई जडली आता दोन जीवांची प्रीती ग ...*
माझ्या मनातील भाव त्यांनी टिपले आहे. शाळेत ही कविता अभ्यासाला असती तर 'मार्कांपुरती' कळली असती. नंतरच्या आयुष्यात तर... साठीपर्यंत फक्त जगण्याची धडपड त्यामुळे आपण इकडे तिकडे बघत नाही. साठीनंतर करावं काहीतरी. ...
मला तर असं वाटतं की बायकोला, कुटुंबाला, नातेवाइकांना, मित्रांना, समाजाला काय द्यायचे ते आणि काय घ्यायचे ते झाल्यावर - एखादा नवा संबंध, नवे नाते, नवे रिलेशनशिप - एस्टॅब्लिश करायलाचं हवं. नवी प्रीत शोधायला हवीच. आयुष्यावर चिंतन करायचेअसल्यास त्याची मदत होते. तटस्थ नजरेने बघितलं की 'दुखं' कमी होते. निसर्गाचे सर्वगामी रूप रमणीय आणि अंतःसूख निर्माण करणारेअसते. पाण्यावर प्रेम करा - गंगापूर धरण बघा अथवा रामकुंडावर जाऊन बसा. ( आपला 'दहावा' येथेच 'साजरा' होणार आहे याचीजाणीव होऊ द्या कारण ते अंतिम सत्य आहे ). अथवा जुन्या नाशकातील जुने वाडे बघा, दरवाज्यावरील नक्षी बघा. खूप काही करतायेईल. प्रेमाला 'सीमा अन बंधनं' नाही. अन्यथा नुसता यंत्रवत श्वास तर चालूच आहे आणि आपण निरर्थक 'वाहत' आहोतच.
Post a Comment