मानकरांचे 'मानकरी'- Top10
मला तर हल्ली भीतीच वाटते, थर्टी फर्स्ट डिसेंबरची. 'पुढचे वर्ष सुखाचे आणि समाधानाचे जाओ', '२०२२ साठी खूप शुभेच्छा', वैगरे वैगरेसारखे मेसेज आले की ते बघावेसे अथवा वाचावेसे अथवा वेचावेसे सुद्धा वाटत नाही - कारण ते e मेसेजेस इमोशन-लेस असतात. भावनांचा ओलावा त्यात नसतो. आपल्या 'शुभ इच्छा' पोहचल्या की नाही हे जाणून घेण्याची आतुरता नसते. बरेच लोक यंत्रात आलेल्याशुभेच्छा, यंत्राने अगदी यंत्रवत reciprocate (अर्थ-(यंत्र) पुढे-मागे हालचाल करणे, परस्परदेवघेव) करतात. या व्यवहारात, नव्या रीतीतभावना उचंबळत नाही, यात अविष्कारहीनता असते, आठवणींचा जागर नसतो - त्यामुळे माणूस नको इतका 'थंड' झालाय असं वाटतं. प्रश्न असाही पडतो की आपण सगळे एकमेकांचे ओळखीचे-निमओळखीचे-बिनओळखीचे भरघोस शुभचिंतक आहोत, तर मग एकसमाज म्हणून आपला उत्कर्ष का बुवा असा रडत खडत चाललाय? *शुभेच्छा म्हणजे अंधश्रद्धाच झाली का?* इथे प्रत्येकाला स्वत:च्यासुखाची गॅरंटी देता येत नाही, तिथे दुस-याच्या समाधानाचा हवाला कोण देणार? मग उगाच बडबोल्या ऐसपैस शुभेच्छा कशालाद्यायच्या?
मी पूर्वी - लहान असतांना - ग्रीटिंग कार्ड्स बनवायचो आणि पोस्टाने पाठवायचो. कंपनीत जेंव्हा काम करायला लागलो तेंव्हा - मी स्वतःकार्ड्स सिलेक्ट करीत असे - समोरच्याच्या आवडी नुसार आणि मराठीत हस्ताक्षर करीत असे. बरेच 'प्राप्तकर्ते' मला आवर्जून सांगायचे - कार्ड मिळाले, खूप आवडले. मलाही अशी किंचित 'पोचपावती' मिळाली की 'बरं वाटायचं'. जसा ई-मेल चा जमाना सुरु झाला तसं ... आयुष्याचे texture - पोत बदललं. यंत्र आलं आणि भावनांचा नाश झाला - भावना झपाट्याने ह्रास पावल्या - शुष्कपणा भरलामनामनात - वातावरणात.
*कधी कधी तर असं वाटतं - मी तुम्हांला शुभेच्छा दिल्याने किंवा तुम्हीं मला शुभेच्छा दिल्याने काहीही एकमेकांना फरक पडत नाही! कारण - त्या शुभेच्छांमध्ये तुमचं-आमचं मन नाही. आणि हे आपण जाणून आहे.* या लयाकडे जाणाऱ्या उताराची मला भीती वाटते.
म्हणून, या भीतीपोटी, मी आज सकाळी ठरवलं - की दहा फोन करायचे - आपण प्रॅक्टिकल शुभेच्छा देऊयात एकमेकांना! कोणाला? तर२०२१ मध्ये जे माझे खूप नवे मित्र झाले आहेत - त्यांच्या पैकी ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, मला आनंद दिला - असे पहिले दहा. 🔝10. म्हणून ते 'मानकरांचे मानकरी' - मी उगाचच भास मारतोय बरं का. कोण आहेत ही 'रत्ने'? ज्यांच्याशी आज मी बोललो - काहींबद्दल सांगतो ...
*अशोक हवालदार* - आभासी मित्र आहे - बंगळुरात असतो. नावाने 'हवालदार' असला तरी तो 'आम्हांला' सकाळी आणि दुपारी'आभासी चहा' पाजतो - म्हणून तो 'चायवाला'. आमच्या 'वाचकांच्या व्हाट्स अप ग्रुपवर' हा सद्गृहस्थ विनोदी, मसालेदार, स्मरणरंजक, असे वेगवेगळ्या चवीचे चहा 'पाजत' असतो. अन तेही सातत्याने. म्हणून तो मला आवडतो. आम्हीं भेटलो नसलो तरी 'भेटलो आहे आणिखूप बोललोसुद्धा आहे'.
*सुरेश कुलकर्णी* - हा तसा दोन महिन्यापुर्वीचा मित्र. पण गप्पा मारतांना असं जाणवतं की आपण जुने मित्र आहोत. बरं सुरेशनाशिकचा असल्याने 'भेटीत तुष्टता मोठी'. चौफेर गप्पांमध्ये याचा 'हात', सॉरी 'तोंड' कोणीही धरू शकणार नाही.
*पूनम कटारिया* - हा आभासी मित्र मुंबईचा - कॉर्पोरेट लॉयर असूनही मनानं खूप हळवा आहे. महिन्यातून एकदा गप्पा होतात. आमचीप्रत्यक्ष भेट झालेली नाही. पण भेटीचा योग लवकर येईल असे वाटते कारण मुंबई नासिक हे अंतर १९० किलोमीटर. पूनम खूप पुस्तकवाचतो. आमच्या व्हाट्स अप वर 'relevant - संबंधित कींवा संयुक्तिक' माहिती कॉपी पेस्ट करण्यात एक नंबर ..
*नव कवी - अविनाश गाडेकर* - याचा कवितासंग्रह नुकताच 'बाहेर' पडला आहे. 'काव्य संग्रहाच्या' प्रसव यातनांबद्दल बद्दल आम्हीं खूपबोललो. कविता 'वास्तववादी' असल्याने मला आवडल्या. वयाने चाळीस असेल बहुदा - त्यामुळे प्रचंड ऊर्जा आहे या 'इंजिनिअर' मध्ये.
*पंडित प्रसाद दुसाने- एक साधक* - पंडित जसराज यांनी प्रसाद यांना 'शिष्यत्व' देण्या अगोदर विचारलं - प्रसाद तुला गायक व्हायचंकी साधक? त्यावर प्रसाद म्हणाला - 'साधक'. आज प्रसाद, पंडित दुसाने आहे .. त्यांची एक घरगुती मैफिल ऐकण्याचा योग सुरेशयाच्यामुळे आला. पंडितांची गुरुदेव दत्त यांच्या प्रति असलेली भक्ती मला भावली. विनय-विनम्रता-समर्पण - पंडितजी कडून शिकावं. प्रसाद हे मला 'दत्ताचा प्रसाद' वाटतात. मी त्यांना माझा मित्र समजतो - आणि vice-versa need not be true.
अजून पाच जणांबद्दल नंतर केव्हातरी.
माझा आजचा 'शुभेच्छांसाठी' केलेला फोन त्यांना अपेक्षित नव्हता. अनपेक्षित घडलं की आनंद जास्त. प्रत्येकाशी झालेल्या पाचसातमिनिटांच्या गप्पा वेगळी 'अनुभूती' देऊन गेल्या.
पाचशे लोकांना शुभेच्छा 'ब्रॉडकास्ट' करण्यापेक्षा पाच जणांशी बोललेलं चांगलं. उथळपणापेक्षा खोलपणा मला भावतो. खळखळाटापेक्षा अथांगपणा मला आवडतो. मी तसं वागतो. हे माझं वैयक्तिक मत आहे.
*सुरू आहे मुखवट्यांचा खेळ... शुभेच्छा देण्याचा आणि घेण्याचा.... असो !
मनांत असो, नसो, खेळ तर खेळावाच लागतो. सुटका आहे काय त्यातून? मी माझी 'सुटका' करून घेतली आहे. तुमचं काय? जमेल काअशा सार्थ शुभेच्छा द्यायला?*
Post a Comment