ओली बाळंतीण
काल एक ओली बाळंतीण माझ्या घरी सश्रद्धेने आली. चारच दिवस झाले होते. मी मोठा (?!) असल्याने बाळाच्या आई बापाने विचारकेला असेल - जरा आशीर्वाद तरी घेऊ.
मी सहसा बाळ हातात घेत नाही. कारण? मला लहान बाळाची मान पकडता येत नाही. बाळ रडायला नको हातात घेतल्या बरोबर ही'अनाहत' भीती. पण बापाने बाळ पुढे केल्यावर माझा नाइलाज झाला अन मी बाळ हातात घेतले. वेष्टनात बांधले होते. सॉररी. दुपट्यातगुंडाळले होते. उगाचंच हिवासाळ्याचा त्रास नको. पहिलटकरणीचं पोर असल्याने मी कौतुकाला सुरवात केली. नाकीडोळी छान होतं. पाय दुपट्यात असल्याने ते बघता आले नाही. पण हात मऊ होते. मला हा स्पर्श खूप आवडतो. मी 'कवतिकाला' प्रारंभ करताच, थांबलो. माय बाप बोलू लागले. अपत्य प्राप्तीसाठी केलेला अट्टाहास जाणवला. आनंदाने चेहरा फुलून गेला होता. स्तनाग्रे स्रवू लागली होती. आईचं मन रुपी चोळी किंचित ओली झाली होती. मला 'थांबवत' आपण खूप बोललो याची आई बापाला जाणीव झाली असावी, बहुदा. आईने पदर सावरला, स्तन झाकले आणि बोलायचं थांबली. वातावरणात 'प्रेग्नन्ट पॉझ' आला.
मग वातावरण 'मोकळं' करण्यासाठी एक फालतू प्रश्न विचारला. दवाखाना कोणता? यातना झाल्या का? खर्च कीती आला? तर - उत्तरंअशी. लखनौ येथील दवाखाना - यातना रहित बाळंतपण झालं आणि खर्च रुपये ७५०० फक्त - नगद.
बाळाशी थोडं खेळल्यावर जाणवलं की बाळ 'एक पेशीय' आहे. अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं ते प्रतिबिंब आहे. चार प्रकारचा आवेगआहे. अमिबा सारखं गर्भाशयात वाढलंय. एक पेशीय असल्याने - आई अन बाप एकच. किंबहुना अवती भोवती बघितल्यावर संवेदनशीलमन जागृत होतं - मनाचा मनाशी संभोग होतो आणि कविता प्रसवते. एल्गार म्हणता येईल का याला? मग मी आईला विचारलं - की - कविता करण्यास कोठून प्रेरणा मिळाली? तर आई उत्तरली की 'पहिल्यापासून आवड ! लिहीत गेलो. लोकांना कविता पाठवल्या. लोकछान छान म्हणत गेले. मग वाटलं - का नाही कविता संग्रह करायचा? मग चौकशी केली आणि कमीत कमी खर्चात 'प्रकाशक मिळवला'. त्याने ७५०० रुपये खर्च सांगितला अन पन्नास प्रति फुकट दिल्या. .... किंडल, अमेझॉन, फ्लिपकार्ड वैगरे वैगरे ....मानकर साहेब - हौशीला मोल नाही ' मग कवीने ऑफिसात कसा सन्मान झाला हे सांगितलं, २५ प्रती विकल्या गेल्या असं सांगितलं. (माझ्याहाताखालच्या लोकांनी प्रती घेतल्या हे ही सांगितलं. मला गंमत वाटली. कवी खूप प्रामाणिक आणि हळवा वाटला.)
एकदिड तास कसा गेला हे कळलं नाही. मी मधेच पुस्तक चाळले. कविता छान होत्या. मी कवीला पुढील अपत्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेल्फी घेतला अन .... कवी आनंदाने घरी गेले - कृतकृतार्थ होऊन.
ते गेल्यावर मी विचार करू लागलो. शब्द ... शब्दांचा शोध ... शब्दांवरचा आपला लोभ ... स्वान्त सुखाय नंतरची ओढ - शब्द छापूनआणण्याची ... इतरांपर्यंत पोहचण्याची .. काही (तरी) सांगायची. खूप आनंद आहे का हो यात? बऱ्याच वेळा फुकट वाटलेली पुस्तकेकपाटात 'समाधिस्त' होतात हे बघितलंय. मी गेली दोन वर्षे विचार करतोय की लिहिलेलं पुस्तक छापायचं की नाही. आणि इकडेअविनाश पुस्तक छापून 'मोकळा' सुद्धा झाला. मीच पहिलटकरणीसाठी 'अडून' बसलोय. कारण कधी कधी मला 'हा शब्द छापण्याचाअट्टाहास' निरर्थक वाटतो. माझ्या शब्दांची 'अवतिभोवतीच्या समाजमनाला अजिबात गरज नाही. त्यांना 'वाचता' सुद्धा येत नाही. समजणं तर दूर राहिलं! '.
तिकडे पुस्तक छापून सुखानं झोपलेला अविनाश अन इकडे मी तळमळत ..... झोप कधी लागली, कळलंच नाही. अविनाश 'अवती' हेनाव वापरून साहित्य सेवा करतो. कविता संग्रहाचे, एक पेशीय बाळाचं नाव आहे - *अवतिगंध*. तुम्हांला बाळाला आंतरजालावर सुद्धाभेटता येईल. (https://www.flipkart.com/avatigandh/p/itmb89869cea89d3?pid=9789355092755&lid=LSTBOK9789355092755CWT7N0&marketplace=FLIPKART&cmpid=content_book_8965229628_gmc)
मला आवडलेली एक कविता उल्का वाचत आहे. ऐका तर 'अवती' काय म्हणतात ते.
खूपच सुंदर
ReplyDeletePost a Comment