शेवटी नियतीने आमच्या कुटुंबावर ..... आमचा 'दादा' गेला. चित्रकार / छायाचित्रकार अनंताच्या वाटेवर निघाला. जरा अकाली गेला, अन असाध्य व्याधीमुळे गेला म्हणून जास्त दुखं. शेवट पर्यंत, अगदी तीन महिन्यांपर्यंत सेवेकऱ्यांचे 'शिंपी दादा', स्वामी समर्थांना 'कलाअर्घ्य' देत होते. अशक्तपणामुळे जेंव्हा कुंचला हातात धरवत नव्हता तेंव्हा 'रंगही' थबकले. बऱ्याच वेळा माझी अन त्याची - कॅनव्हास, रंग, ऑइल या विषयावर चर्चा व्हायची. शेवटपर्यंत हा कलाकार 'प्रयोगशील' होता, शेवटपर्यंत हा स्केचिंगचा 'रियाझ' करायचा. तीनमहिन्यांपूर्वी त्याने यूरोपियन चित्रकाराचं पुस्तक मागवलं होतं - केवळ ऑइल पेंटिंग्स करतांना टेक्सचर कसं निर्माण करतात हेसमजण्यासाठी. मी जेंव्हा 'व्हॅन गॉग विषयी बोलायचो तेंव्हा त्याचे कान पूर्ण माझे असायचे. मला सारखं काही ना काही नवं सांगतअसायचा. मी ही या माझ्या चित्रकला गुरूला मन देऊन ऐकायचो. कधीपासून? - जेंव्हा मी ३/४ वर्षांचा होतो तेंव्हापासून. पाटी, पेन्सिलअन कागदाचा शोध लागल्यापासून. अगदी त्याच्या 'शेवटापर्यंत'.
आमच्या सात भावांमध्ये 'शांताराम' सर्वात मोठा होता म्हणून तो दादा. पण त्याने कधीही 'दादागिरी' केली नाही. तो खऱ्याअर्थाने'पुरुषोत्तम' होता. कुटुंबाचा 'खांब' होता. फुलांचा सुगंध केवळ वाऱ्याच्या दिशेने पसरतो; मात्र व्यक्तीचे चांगले गुण सर्व दिशा व्यापूनटाकतात. असा हा सर्वव्यापी होता. कुटुंबवत्सल आणि समाजवत्सल. विनोदाला त्याने इतके हाताशी धरले होते की कधी कधी मलाभीती वाटायची याच्या विनोदाच्या अतिरेकामुळे कोणाचा रोष नको उद्भवायला. पण तसे झाले नाही. लहान थोरांशी सारख्याचं तन्मयतेनेतो गप्पा मारायचा. सर्वांना 'बरोबर' घेऊन चालणार आमचा 'दादा' पुढे निघून गेला आहे.
त्याला सिनेमा फार आवडायचा. दिग्दर्शकाने फोटोग्राफरकडून कोणती फ्रेम कशी वापरली हे तो मला सांगायचा. हळू हळू मलाही सिनेमासमजायला लागला. मग मी त्याला युरोपियन सिनेमा आणि फिल्म फेस्टिवल बद्दल सांगायचो. पण त्याच्याबरोबर फेस्टिव्हलचा योगआला नाही - कारण? - तो म्हणायचा - अरे अनिल मला ते फास्ट इंग्लिश कळत नाही ?!
असाध्य रोगाशी संपर्कात आल्यानंतरही त्याच्या मनात नकारात्मकता नव्हती. याचं कारण - अध्यात्म. तीन महिन्यांपूर्वी म्हणाला होता - अरे अनिल मी शहात्तर वर्षे जगणार आहे. काळजी नाही. हातातले समर्थांचे तीन चार फोटो पूर्ण करतो. पण तीन महिन्यातच ...
त्याला 'खांदा' देतांना मन विव्हळत आहे. काळजाचा तुकडा कोणीतरी काढून घेतला आहे असं वाटतंय. गेल्या महिन्यापासून मी त्याच्यावेदना बघत होतो आणि दररोज थोडं थोडं रडत होतो, तेही त्याच्या नकळत. एकदा हॉस्पिटल मधून निघत असतांना तो मला 'थँक्स' म्हणाला. मी जरा रागातच म्हणालो - लवकर बरा हो म्हणजे थँक्सचं बघता येईल. दुसऱ्या दिवशी त्याची भेट घेतल्यावर निघालो तेंव्हाकाही बोलला नाही. मी नजरेनेच विचारलं ' आज थँक्स नाही?'. तर म्हणाला 'काल तुला राग आला होता ना ...म्हणून आज थँक्स नाही '.
आणि आज 'मी बिलकुल रडलो नाही'. आज वेदांत - वेदनांचा अंत झाला. मला त्याचा राग आलाय, लवकर गेला म्हणून ... गर्भातल्याअंधारापासून ते अवकाशातील अंधारापर्यंतच्या दरम्यान - तो जे काही प्रकाशात होता तेंव्हा त्याने सत्कर्मच केला - उदाहरणार्थ माझा गुरुझाला. थँक्यू दादा.
Post a Comment