आजच 'कौतुक' झालंच पाहिजे!
आज मी ठरवून (इतरांच्या दृष्टीने कदाचित) 'वेडेपणा' करायचं ठरवलं आहे. माझ्या दृष्टीने 'ते' करणं गरजेचं आहे म्हणून त्याला मी'शहाणेपणा' ( शहाणपणा नाही ) म्हणेन.
तीन महिन्यांपूर्वी नुकताच दिवंगत झालेला मोठा भाऊ मला म्हणाला, 'अरे अनिल, आपल्याला एक गेटटुगेदर करायचं आहे'. मी तत्काळ'हो' म्हणालो. म्हटलं 'तू लवकर बरा हो. मग करू तुझ्या मनासारखं'. त्या वेदना भोगत असतांनाही तो खुलला आणि म्हणाला, 'या वेळीआपण आपल्या सुनांचे सत्कार करू. त्यांचा सन्मान करू. आपल्या सगळ्या भावांना सुना चांगल्या मिळाल्यामुळे कुठे 'खिटपिट' नाही. अरे या इतर घरातून आलेल्या 'मुलींचं' कौतुक कधी होतंच नाही'. मला आयडिया मनापासून आवडली होती. तेंव्हापासून आयडियेनेमाझ्या मनात घर केलं होतं. पण भाऊ 'मधेच' परलोकी गेला.
उद्या त्याचा दहावा. आज मी दादाकडे संध्याकाळी 'हेतू पुरस्कर' गेलो. सगळ्यांनी जेवणं केली. नंतर घरातले जे कोणी होते ते, पाहुणेरावळे, त्यांना एकत्र बोलावले. अन बोलू लागलो - म्हटलं - *दादाचं अन माझं असं असं बोलणं झालं होतं. ज्या मुलींनी आपल्याघराच्या भितींना अर्थ दिला, ज्यांनी त्यांचे सूर आपल्यात मिळवले, ज्यांच्या अश्रूंमधूनही प्रेमच झिरपले, त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा. आज आपण दादाची सून शिल्पा हिचं जाणीवपूर्वक कौतुक करू.*
शिल्पाने सासऱ्याची सेवा न कंटाळता केली. आलेल्या प्रत्येकाचं यथायोग्य स्वागतच केलं. कधी कधी ती मला दमलेली वाटायची पणतरीही तिने चहाचं अगत्य केलंच. दादाची पेज, चहा हा वेळेवरचं व्हायचा. कोणीतरी वाचक मनातल्या मनात म्हणेल - त्यात काय विशेष? कर्तव्य तर केलं! त्यावर मी एव्हढंच म्हणेन - हल्ली मुलांची, मुलींची, सुनांची कर्तव्यदक्षता 'औषधापुरती' सुद्धा राहिलेली नाही (अशीबोंब आपण सदासर्वदा मारत असतो. वृद्धाश्रम भरलेली आहेत). म्हणूनच 'शिल्पाचं' कौतुक करणं मी, एक सासरा, माझं कर्तव्य समजतो. मला असंही वाटतं की आपण 'कौतुकही' तत्परतेने करावे. वेळ निघून गेली की भावनांची धार बोथट होते. त्यातला 'समयोचितपणा' संपतो. दादाचा शिल्पावर कीती जीव होता हे शिल्पा मला सांगत होती - म्हणे - 'माझं ड्रेस मटेरियल, साडी वैगरे सिलेक्ट करतांना दादामदत करायचे. मी जीन्स वापरावी, चार चाकी चालवावी म्हणून ते आग्रही होते. वडिलांच्या जागी होते ते मला.' मग ती हुंदका आवरूशकली नाही.
अशी ही आमची सून. कौतुक करतांना तिला दोन कॅडबऱ्या दिल्या. कुछ मिठा हो जाय | ते ही आज ?! कारण जे माझ्या भावाला करायचेते मी करीत आहे. माझ्या सुनेचं मी नेहमी कौतुक करतो ... आज माझ्या चुलत सुनेचं ...
हे लिहितांना मला एक कविता उद्धृत करावीशी वाटते. सुनेचं स्थान घरात फार महत्वाचे आहे.
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी
या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती
वाचकहो काही चुकलं का माझं ?
Post a Comment