साधू संत येति घरा ...
माझी दिवाळी कालच झाली कारण एक संत अथवा साधू काल मला शोधत शोधत घरी आला. निवांत थांबला. आनंद देऊन गेला. तेक्षण कसे होते हे सांगण्यासाठी हा 'व्यक्ती चित्र' प्रपंच. तुमच्या समोर 'भालचंद्र' उभा राहिला तर ... माझे शब्द सार्थकी लागतील. दिवाळीच्या शुभेच्छा आधीच देतो.
साकेतने पाठवलेली बटर चिकन अर्धी संपली होती आणि माझ्या तृप्ततेने उचांक गाठला होता. तेव्हढ्यात फोन आला - निनावी. 'मीभालचंद्र बोलत आहे. अमोलने, म्हणजे माझ्या मुलाने, ऍमस्टरडॅम ( नेदरलँड ) वरून सांगितलं की - नासिकला गेलाच आहात तर मानकरकाकांना भेटूनच या. तर कधी येऊ मी? - इति काका. मी उत्तरलो - 'कधीही या! आज संध्याकाळी या'. काकांनी किंचित पॉझ घेतलाआणि म्हणाले -'मी आता मेहेरवर उभा आहे. कामं झाली आहे. मी लगेच आलं तर चालेल का? बसू चार पाच तास गप्पा मारत'. मी पुढचाआणि मागचा 'विचार' न करता 'या' म्हणालो. काय कारण असेल, तत्परतेने 'या' म्हणायचं?
अशीच तत्परता अमोलने २०१९ मध्ये दाखवली होती. हा अँस्टरडॅमचा अमोल माझ्या मित्राचा मित्र. मी आईसलँडला असतांना त्यालाकळलं की मी युरोपमध्ये आहे. त्याने ताबडतोब मला 'आमंत्रण' दिले - 'या घरी, मी तुम्हांला ऍमस्टरडॅम दाखवतो'. त्याचे जबरदस्त अगत्यपाहून मी 'हरपलो' (अचानक समोर अशी काही गोष्ट, जी अकल्पित वाटते, ती घडली तर भान हरपायला होते.) आणि 'येतो' म्हणालो. मीमाझं होस्टेलचे बुकिंग कॅन्सल केले. नेदरलॅंडला पोहचल्यानंतर अमोल आणि कादंबरीने आमची, राजाची आणि माझी, मनापासूनबडदास्त ठेवली. त्यांच्या अगत्याचा 'दरवळ' अजूनही मनात ताजा आहे. म्हणून मी अमोलच्या वडिलांना लगेच 'या' म्हणालो.
बरोबर दहा मिनिटांनी, बहुदा अमृत महोत्सवी वर्षात असलेले, काका दुपारच्या दीडच्या उन्हात घाम पुसत पुसत, पायी, माझ्या घरीअवतीर्ण झाले. पाणी प्यायला जेवढा वेळ लागतो तेव्हढी उसंत घेतली आणि बोलावयास प्रारंभ केला. साडेतीन तास गप्पा मारल्या ... म्हणजे तेच बोलत होते.
संबंध जीवनाकडे पाहणाऱ्या अशा निराळ्या वृत्तीची अचानक ओळख झाली. पुष्कळ जुन्या गोष्टी नव्याने दिसू लागल्या. काकांचं वयपंच्याहत्तर. मोठ्या अभिमानानं सांगतात - 'एक गोळी घेत नाही. बत्तीस दात शाबूत आहे.' गप्पा खुलवण्यासाठी मी विचारलं ' तब्बेत कशी....'. तर म्हणाले 'मी MSEB मध्ये 'मीटर रीडर' होतो. नासिक आणि आजूबाजूचे जिल्हे १९६०-९० च्या दरम्यान पायी पिंजून काढलेआहे. त्यामुळे आजही 'ताठ चालत' आहे. मग त्यांनी 'मीटर रिडींग' घेतांनाच्या गमतीजमती सांगितल्या. एखादा माणूस आपला जॉबकिती सिरियसली घेतो याचं मूर्तिमंत उदाहरण मी 'अनुभवत' होतो. गूढ कवितेतील नाजूक बारकावे अगदी रेशमी हातांनी अलगदउलगडून सांगणारा कवी आणि काका यांच्यात मला साधर्म्य दिसलं. प्रचंड प्रामाणिकपणा. गोष्टी सांगण्याची हौस. माणूस सुखात असोकी दुःखात असो, माणसाला सोबत लागते आणि ही सोबत करण्याचे काम गोष्ट करते. मुळात माणूस हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे.
गप्पांच्या ओघात कळलं की काका नॉनव्हेज आहे. बटर चिकन होतीच. काकांना सांगितलं की 'तुम्हीं आता जेवून घ्या'. कसलेही आढेवेढेन घेता काका छान जेवले. 'सहा महिन्यानंतर इतकं सुंदर चिकन खाल्लं' असंही म्हणाले. या ब्रेक नंतर 'गाडी' पुनश्च एकदा धावू लागली - १९६०-९० मध्ये. मलाही मजा येत होती - विविधतेने नटलेल्या, संवेदनक्षम मनाला ऐकतांना.
पण कुठे तरी सल होता. काहीतरी हरवलं आहे मानकर साहेब या शहरात. काय हरवलं ते कळत नाही. मग ते शोधायला जातो मी'सुरगण्याला'. जुनी लोकं भेटतात. निरपेक्ष प्रेम मिळतं. मुख्य म्हणजे 'आठवणींचा जागर' होतो. अहो प्रत्येक पाड्यावर 'आपली माणसं' भेटतात. मी जे 'शोधत' आहे ते मला इथे सापडतं मग मी करतो मुक्काम. 'मानकर साहेब, कधीही सांगा, आपण जाऊ कसमादे(कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्ट्यात किंवा सुरगण्याला.
गाडीचा ट्रॅक बदलावा म्हणून सहज विचारलं ' अमोल कडे किती वेळा गेलात आणि टाईमपास कसा करता?'. मी नेमका प्रश्न विचारलाहे मला लगेच कळलं. काकांची कळी खुलली आणि ते सांगू लागले - ' आत्तापर्यंत चार वेळा गेलो होतो नेदर्लंडला. तिथेही मी खूपफिरतो. अमोल सांगतो कसं फिरायचं ते आणि कादंबरी डबा करून देते. आत्तापर्यंत मी जवळपास मी शंभर म्युझिअम्स बघितली आहे. वही आणि पेन बरोबर ठेवतो. आवडलेली वस्तू दिसली की त्यांच्या 'नोंदी' ठेवतो. मला तेथे अजिबात कंटाळा येत नाही. ..... वैगरे .... वैगरे .....'
एक कलासक्त माणूस मी बघत होतो. पंच्याहत्तर दिवाळ्या अनुभवलेल्या माणूस. रसरसून जगणारा साधू की संत? जीवनाकडेपाहण्याचा स्वच्छ आणि सुंदर दृष्टिकोन देण्याची ताकत आहे या माणसात. म्हणून म्हणतो 'साधू संत येति घरा, तोचि दिवाळी अनदसरा'. माझ्या जीवनात निरंतर दिवाळी चालू आहे. काकांनी आज 'काजळी दूर केली' -
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥
तुम्हां सर्वांस दिवाळीच्या खूप शुभेच्छा.
Sands Casino & Resort in Las Vegas, NV - Hotels - December
ReplyDeleteLocated at: 4075 Las Vegas Blvd South, Sands Casino & Resort is a hotel within a 10-minute drive of Gold Strike Casino and Sands Convention Center. 샌즈 카지노 주소
Post a Comment