*काल - म्हणजे आठ दिवसांपूर्वी *
बोलता बोलता माझं आणि अनाहताचं अग्रीमेंट झालं. अग्रीमेंट असं होतं की - ती खेळून दमली की मी तिचे पाय चेपून द्यायचे - पन्नासवेळा! त्याच्या बदल्यात तिने माझ्या पाठीवर पाय द्यायचे - तीन मिनिटे. पण हे अग्रेमेन्ट पूर्णत्वास काही गेलं नाही कारण परस्परपूरकअसा योग आला नव्हता. अनाहताला मी दोनदा आठवण करून दिली तर म्हणते - 'आज नाही हो बाबा. नंतर पाहू'. याचा अर्थ असा कीती दमली तरच माझ्या पाठीची 'सेवा' होणार. अनाहताकडून आणि त्वमेव कडून पाठ 'तुडवून' घेणं हे माझ्याकरिता सध्यातरी स्वर्गसुखआहे. दोघही हल्ली कंटाळा करतात कारण ती आता मोठी होत चालली आहे. 'पाठीवर पाय देणं' ही लहान मुलांचीच मक्तेदारी आहे. मीसुद्धा आजीच्या पाठीवर दहा/बारा वर्षांचा होई पर्यंत पाय देत होतो. त्या नंतर प्रत्येक 'वाढदिवसानंतर' पाय देणं कमी झालं. आजीचिडायची, पण मी काही 'भीक' घातली नाही. आणि हल्ली अनाहता मला 'भीक' घालत नाही.
*आज म्हणजे आत्ता*
आज काय झालं - संध्याकाळी - उल्काने अनाहताकरिता फ्लोरेसंट मार्कर आणला - कुठल्या तरी दुसऱ्या तिसऱ्या अग्रीमेंट नुसार. बाईसाहेब एकदम खुश. पण तिला हा मार्कर घेऊन आगळा वेगळा अविष्कार कसा करावा हे सुचत नव्हतं. इकडॆ तिकडे रेघोट्या मारूनसमाधान न झालेली अनाहता मोठया प्रेमाने माझ्या मांडीवर येऊन बसली. हळूच विचारलं 'बाबा तुमचे केस 'हायलाइट करू'. मी विचारलं'म्हणजे?'. त्यावर ती म्हणाली 'ह्या मार्करने तुमचे केस पिंक शेडचे करते'. मी 'नाही' म्हणालो. आधीच थोडे केस उरले आहे, त्यांचे हालनको. पण आजोबांच्या 'हालाची' तिला चिंता नव्हती. तिला तिचा अविष्कार शांत बसू देत नव्हता. खूप चर्चा झाली. तिने लाडिक पद्धतीने- * बाबा करु द्याना हो हाईलाइट *- अश्या विनवण्या केल्यावर मी 'नेहमीप्रमाणे' विरघळलो. माझं अंग आज जरा कसकसत होतं. मीपरिस्थितीचा फायदा उठवायचं ठरवलं.
मी अनाहताला म्हटलं 'आपण आज दुसरं अग्रीमेंट करू. तू माझे केस हायलाईट केल्यावर माझ्या पाठीवर पाय द्यायचे. चालेल का ?' मला वाटलं ती तत्काळ 'हो' म्हणेल - कारण तिचा अविष्कार वाट बघत बसला आहे. पण तिने प्रतिप्रश्न केला 'कीती वेळ?'. (एव्हढीगरज असूनही तिने निगोशिएशन्स - देवाण,घेवाण चालू ठेवली.) मी सांगितलं 'दहा मिनिटे!'. त्यावर म्हणते कशी 'बाबा दहा मिनिटे जास्तहोतात. पाच मिनिटे देईन. चालेल?'. बॉल आता माझ्या कोर्टात होता. मीही शॉट मारला, म्हणालो 'चालेल काय, पळेल. जेवण झालं कीकर तू हायलाईट'. माझ्या एक लक्षात आलं कि प्रत्येक वाढदिवसागणिक माणसाची देवाण - घेवाण' कौशल्य वृद्धिंगत होत असतं. माणूस हळूहळू स्वार्थी होत जातो. तीच्याकरिता मी जेवण आठला उरकलं आणि अंग कसकसत असल्याने गादीवर पडलो.
यथावकाश 'माझे केस रंगवले गेले.' थोडासा त्रास झाला पण तो सुखद असल्याने मी ओरडलो नाही. तीच्या मुक्त अविष्कारास वाटमोकळी करून दिली - अग्रेमेन्ट नुसार - कारण पाय 'देऊन घेणं' अजून बाकी होतं. पार्टनरने 'धोका' दिला तर कुठे कोर्ट कचेरी करणार. मीजरा सबुरीने घेत होतो कारण जर ती म्हणाली असती की 'बाबा आता मी दमले. पाठीवर पाय उद्या' तर मी हतबल 'आजोबा' कायकरणार. माणसाच्या आयुष्यात विकल्प खूप कमी असतात असं 'वाटून' गेलं. असो. उल्काने शूटिंग केलं.
नंतर आमच्या पार्टनरने आमच्या पाठीवर पाय दिले. अहाहा. काय तो आनंद. अंग कसकसत असतांना कोणी अशी नैसर्गिक 'क्रोसीन' दीली की 'औषधात'सुद्धा मजा असते हे कळतं. तेही 'नातीने' पाय दीले की असं वाटतं की 'वेळ इथेच थांबली पाहिजे.' पण तसं शक्यनाही. वेळ पुढे जाणार आणि आपण 'वाढत' राहणार. विचारांची आवर्तनं चालू असतांना मी झोपेच्या कधी आहारी गेलो हे कळलंच नाही. आणि स्वप्न सुरु झाले. स्वप्नात मी माझ्या आजीच्या पाठीवर पाय देता आहे हे बघत आहे. तिने मला पाच पैसे दिले ते आठवलं. वरूननीट ऐकू आलं ती जे म्हणाली ते - 'पैसे खर्च करू नको. साठव.' मी तिला फसवलं आणि लगेच 'रावळगाव चॉकलेट आणलं'. मग मीआणखी लहान झालेलो दिसलो स्वप्नात. आई माझ्यावेळीस 'बाळंतीण' झाली तेंव्हा पर्यंत. आणि माझा जन्मही मी बघितला. अगदीअनाहतासारखा. आणि तो पहिला 'टाहो' ऐकला, स्वप्नात. अचानक जागा झालो. घड्याळात पाऊणे बारा वाजले होते.
*उद्या म्हणजे - दहा सप्टेंबर *
पंधरा मिनिटांनी दहा सप्टेंबर सुरु होणार. पहाटेचा जन्म माझा. एकसष्ट वर्षांचा प्रवास! कसा होता? - विचाराल तर सांगीन - *समृद्धप्रवास* झाला. सगळं नीट आठवतं - पाठीवर पाय देण्यापासून ते पाठीवर पाय घेण्यापर्यंत. केवळ मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांच्याशुभेच्छा आहेत म्हणून सुंदर 'ज ग लो' ...
गंमत म्हणून गुगल केलं - १९५० पासून २१०० पर्यंत, गणेश चतुर्थी १० सप्टेंबरला कीती वेळा आली आणि येणार आहे? - तर उत्तरमिळालं - १९८३, २००२, २०२१ - आज, २०४०, २०७८. फक्त पाच वेळा.
बाप्पा जय जय.
https://www.timeanddate.com/holidays/india/ganesh-chaturthi#tb-hol_obs
Post a Comment